7/12 विषयी

Wednesday, August 26, 2026

पशुधन विमा योजना 2026

 

पशुधन विमा योजना 2026 
महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय

अधिक माहितीसाठी आपल्‍या जवळच्‍या पशुवैदयकिय अधिकारी कार्यालयास भेट दया. 

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) अंतर्गत ‘पशुधन विमा योजना’ (Livestock Insurance Scheme) महाराष्ट्र राज्यात राबविण्यास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने शासन निर्णय क्रमांक DAHD-14026/4/2026/पदुम-4 (ई-1769413), दिनांक 05 ऑगस्ट 2026 रोजी हा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
त्यानंतर या शासन निर्णयातील दोन तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी शासन शुद्धीपत्रक क्रमांक डीएएचडी-14026/4/2026/पदुम-4 (ई-1769413), दिनांक 06 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.


पशुधन विमा योजना का राबविण्यात येत आहे?

हवामानातील अनपेक्षित बदल, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, विषबाधा, सर्पदंश, दूषित पाणी, गंभीर अपघात तसेच विविध संसर्गजन्य व साथीच्या रोगांमुळे पशुधन दगावल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अशा परिस्थितीत विमा संरक्षणाच्या माध्यमातून पशुपालकांना त्वरित आर्थिक नुकसानभरपाई उपलब्ध करून देणे, त्यांचे आर्थिक स्थैर्य कायम राखणे तसेच त्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचविण्याच्या उद्देशाने राज्यात पशुधन विमा योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Mission) अंतर्गत “नाविन्यपूर्ण संशोधन व विस्तार उपअभियान” या घटकांतर्गत पशुधन विमा योजनेचा समावेश केला आहे.

त्यानुसार महाराष्ट्र शासनाने 25 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पशुधन विमा योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता दिली होती.


महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत योजनेची अंमलबजावणी

राज्यात पशुधन विमा योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर (MLDB) या राज्य अंमलबजावणी संस्थेमार्फत योजना राबविण्यात येणार आहे. विमा कंपनीची निवड करण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेत Agriculture Insurance Company of India Ltd. (AIC) यांनी सर्वात न्यूनतम विमा हप्ता दर दिला असून त्या दरास शासनाने मान्यता दिली आहे.


पशुधन विमा योजनेचे निकष

1. योजनेत समाविष्ट पशुधन या योजनेमध्ये पुढील पशुधनाचा समावेश करण्यात आला आहे :

  • देशी व संकरित दुधाळ गायी
  • म्हशी
  • बैल
  • रेडे
  • शेळ्या
  • मेंढ्या


2. प्रत्येक कुटुंबासाठी पशुधनाची कमाल संख्या

06 ऑगस्ट 2026 च्या शासन शुद्धीपत्रकानुसार सुधारित तरतूद :

प्रत्येक कुटुंब कमाल पशुधन संख्या – 10 पशुधन घटक.

एखाद्या लाभार्थ्याकडे 10 पशुधन घटकांपेक्षा जास्त पशुधन घटक असल्यास आणि सदर पशुधनासाठी विमाकवच घेण्यास पशुपालक इच्छुक असल्यास, 10 घटकांपेक्षा जास्त असलेल्या पशुधनासाठी विमा हप्त्याची पूर्ण रक्कम पशुपालकाने भरणे आवश्यक राहील.


3. प्रति पशुधन कमाल विमा संरक्षित रक्कम

पशुधनाच्या प्रकारानुसार कमाल विमा संरक्षित रक्कम पुढीलप्रमाणे आहे :

पशुधन            कमाल विमा संरक्षित रक्कम
दुधाळ गाय                    ₹70,000
दुधाळ म्हैस                    ₹80,000
बैल                    ₹70,000
रेडा                    ₹80,000
शेळी / मेंढी                    ₹7,000


4. विमा हप्त्यातील लाभार्थी व शासनाचा हिस्सा

या योजनेमध्ये :
  • लाभार्थी हिस्सा – 15%
  • उर्वरित हिस्सा – 85%
  • केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा 60:40 या प्रमाणात राहील.


5. विमा कालावधी

विम्याचा कमाल कालावधी 3 वर्षे राहील.

लाभार्थ्याच्या इच्छेनुसार विमा कालावधी :

  • 1 वर्ष
  • 2 वर्षे
  • 3 वर्षे

यापैकी असू शकतो.


6. पशुधनाचे विमापात्र वय

पशुधनाचा प्रकार1 वर्षाच्या पॉलिसीसाठी 2 वर्षांच्या पॉलिसीसाठी3 वर्षांच्या पॉलिसीसाठी
सर्व स्थानिक/संकरित गाय / बैल    2 ते 8 वर्षे    2 ते 7 वर्षे    2 ते 6 वर्षे
म्हैस / रेडा    3 ते 10 वर्षे    3 ते 9 वर्षे        3 ते 8 वर्षे
शेळी / मेंढी    1 ते 3 वर्षे    1 ते 2 वर्षे    1 वर्ष


7. विमा प्रीमियम दर

निविदा प्रक्रियेनंतर प्राप्त झालेला विमा प्रीमियम दर पुढीलप्रमाणे आहे 

विमा कालावधीकेंद्र शासनाने निर्धारित केलेला दरनिविदेनंतर प्राप्त प्रीमियम दर

1 वर्ष            4.50%            4.30%
2 वर्षे            8.00%            7.50%
3 वर्षे            11.00%            10.50%


8. पशुधनाचे मूल्यांकन व विमा रक्कम

पशुधनाचा विमा उतरविण्यासाठी त्याची किंमत चालू बाजारभावानुसार निश्चित केली जाईल. विमा उतरविण्यात येणाऱ्या पशुधनाची किंमत लाभार्थी आणि विमाकर्ता यांच्याद्वारे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत संयुक्तपणे निश्चित केली जाईल. दुधाळ गायीची विमा संरक्षित रक्कम निश्चित करताना ₹3,000 प्रति लिटर प्रतिदिन दूध उत्पादन आणि म्हशीसाठी ₹4,000 प्रति लिटर प्रतिदिन दूध उत्पादन याप्रमाणे परिगणित करून किंमत निश्चित केली जाईल.

मात्र विमा संरक्षणासाठी :

  • दुधाळ गाय – कमाल ₹70,000
  • दुधाळ म्हैस – कमाल ₹80,000
  • शेळी/मेंढी – कमाल ₹7,000

इतकीच कमाल किंमत राहील.


9. विमा संरक्षणासाठी पात्र पशुधन

विमा उतरविण्यात येणाऱ्या पशुधनाची नोंद 12 अंकी इअर टॅगद्वारे भारत पशुधन प्रणाली – NDLM (नॅशनल डिजिटल प्रणाली) वर असणे आवश्यक आहे. तसेच शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले पशुधनाचे स्वास्थ्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.


10. विम्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पशुपालकाने पुढील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे :

ओळखपत्र

पुढीलपैकी कोणत्याही ओळखपत्राची स्व-प्रमाणित प्रत :

  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत

पशुधनाचे फोटो

पशुधनाचा सर्व बाजूंचा उभा फोटो, ज्यामध्ये टॅग नंबर स्पष्ट दिसणे आवश्यक आहे.तसेच पशुपालकासोबत पशुधनाचा उभा फोटो, ज्यामध्ये कानातील इअर टॅग स्पष्टपणे दिसणे बंधनकारक आहे. विमाकर्ता UID प्रणालीव्यतिरिक्त RFID चा वापर करू शकतो.

पशुस्वास्थ्य प्रमाणपत्र

महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषद / भारतीय पशुवैद्यकीय परिषद यांच्याकडे नोंदणीकृत खाजगी किंवा शासकीय पशुवैद्यकीय व्यावसायिकाने प्रमाणित केलेले पशुस्वास्थ्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.


11. नुकसानभरपाई / विमा दावा

विमा कालावधीत पुढील कारणांमुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई / विमा दावा देण्यात येईल :

  • अपघात
  • नैसर्गिक आपत्ती
  • पूर परिस्थिती
  • वीज पडणे
  • दुष्काळ
  • वादळ
  • वणवा
  • उष्णतेची लाट
  • भूकंप
  • नैसर्गिक मृत्यू
  • रोग


12. लसीकरणाची अट

नुकसानभरपाई / विमा दावा मंजूर करताना शासनाने नियमित केलेल्या सर्व रोगांचे लसीकरण पशुधनास केलेले असणे आवश्यक आहे. विशिष्ट रोगांवर लस उपलब्ध नसलेल्या परिस्थितीत लसीकरण किंवा विना-लसीकरण विचारात न घेता विमा दावा देण्यात येईल.


13. विमा संरक्षणात समाविष्ट नसलेल्या बाबी

पशुधनाची पूर्ण किंवा आंशिक अपंगत्व विमा संरक्षणामध्ये समाविष्ट नाही. तसेच वाहतूक (Transport) विमा संरक्षणामध्ये समाविष्ट नाही. शेळी/मेंढ्यांचा व्यवसाय स्थलांतरित पद्धतीने केला जात असल्यामुळे शेळी/मेंढ्यांच्या बाबतीत विमा संरक्षण महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक सीमांच्या मर्यादेत लागू राहील.


14. विमा संरक्षण कधी लागू होईल ?

विमा काढण्यासाठी पशुधन पात्र असल्याची पडताळणी झाल्यानंतर विमा संरक्षणासाठी विहित प्रीमियम भरण्यात येईल. पशुपालकाकडून विमाकर्त्याला प्रीमियम प्राप्त झाल्यानंतर अपघाती दाव्यांसाठी त्वरित विमा संरक्षण लागू होईल. मात्र बिगर-अपघाती दाव्यांसाठी 15 दिवसांनंतरचा कालावधी पात्र राहील.


15. विमा अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहता येणार

विमा कंपनीने विकसित केलेल्या पोर्टल / समर्पित सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मवर विमा अर्जाची स्थिती पाहता येईल.


16. विमा दावा प्रस्तावास मंजुरी देण्याची 5 दिवसांची मुदत

या बाबतीत 06 ऑगस्ट 2026 च्या शासन शुद्धीपत्रकाद्वारे महत्त्वाची सुधारणा करण्यात आली आहे.

मूळ शासन निर्णयातील : “नुकसानभरपाईसाठी विमा प्रस्ताव सादर केल्यानंतर 5 दिवसांच्या आत प्रस्तावास मंजुरी देणे बंधनकारक राहील.”या मजकुराऐवजी पुढील सुधारित मजकूर लागू करण्यात आला आहे : “नुकसानभरपाईसाठी विमा प्रस्तावासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 5 दिवसांच्या आत प्रस्तावास मंजुरी देणे बंधनकारक राहील.”


17. नैसर्गिक आपत्ती व अपघाती मृत्यूच्या दाव्यांसाठी कागदपत्रे

नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झालेल्या पशुधनाच्या बाबतीत स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक आणि तलाठी यांचा संयुक्त पंचनामा सादर करणे बंधनकारक आहे.

अपघाती मृत्यूच्या सर्व दाव्यांमध्ये स्थानिक पोलीस स्टेशनचा FIR पंचनामा सादर करणे बंधनकारक आहे.


18. RFID तंत्रज्ञानाचा वापर

पशुधनाची अचूक ओळख आणि पारदर्शकतेसाठी विमाकर्ता कंपनी नेहमीच्या UID प्रणालीसोबत Radio Frequency Identification Device (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करू शकेल.


19. पशुधनाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनीला कळविणे

पशुधनाचा मृत्यू झाल्यानंतर विमाधारकाने तात्काळ म्हणजे 24 तासांच्या आत विमा कंपनीला कळविणे आवश्यक आहे.

ही सूचना विमा कंपनीने विकसित केलेल्या मोबाइल अॅप/संकेतस्थळ/कंपनीने दिलेल्या पत्त्यावर/ई-मेल/फोन नंबरवर फोन, ई-मेल किंवा नोंदणीकृत पत्राद्वारे देता येईल.

सूचना देताना :

  • पॉलिसी क्रमांक
  • UID टॅग क्रमांक
  • विमाधारकाच्या बँकेचे नाव
  • मृत्यूची तारीख व वेळ
  • मृत्यूचे कारण

इत्यादी माहिती द्यावी.

विमा संरक्षणासाठी अर्ज व दावे सादर करणे आवश्यक राहील.


20. मृत पशुधनाचे शव किती वेळ ठेवावे?

विमा कंपनीला मृत पशुधनाची पाहणी/तपासणी करता यावी यासाठी विमा कंपनीला सूचना दिल्यापासून :

  • सामान्य परिस्थितीत 24 तास
  • अपवादात्मक परिस्थितीत 36 तासांपर्यंत

मृत पशुधनाचे शव मृत्यूच्या ठिकाणी ठेवण्यात यावे.


21. इअर टॅग गहाळ झाल्यास

पशुधनाच्या कानातील टॅग गहाळ झाल्यास त्याची माहिती तात्काळ किंवा टॅग गहाळ झाल्यापासून 24 तासांच्या आत विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनीकडून नवीन टॅगद्वारे पशुधनाचे टॅगिंग करून घ्यावे. “No Tag No Claim” या अटीचे विमा कंपनीकडून काटेकोर पालन केले जाईल. नैसर्गिक आपत्तींमध्ये झालेल्या मृत्यूच्या बाबतीत याला अपवाद आहे. विमा कंपनीच्या तपासणीच्या वेळी मृत प्राण्यावर वैध टॅग आढळला नाही तर विमाधारकाचा दावा थेट फेटाळला जाईल.


22. विमा दावा निकाली काढण्यासाठी आवश्यक प्रमुख कागदपत्रे

विमा दाव्यांची पडताळणी पुढील प्रमुख कागदपत्रांच्या पूर्ततेवर केली जाईल :

  1. विम्याची मूळ पॉलिसी प्रत.
    मूळ प्रत गहाळ झाल्यास विमा कंपनीने दुय्यम प्रत PDF स्वरूपात त्वरित देणे बंधनकारक आहे.
  2. पशुधन मृत झाल्याबाबत विमा कंपनीला विहित मुदतीत दिलेली लेखी/डिजिटल सूचना.
  3. रीतसर भरलेला विमा दावा फॉर्म (Claim Form).
  4. नोंदणीकृत पशुवैद्यकाने दिलेले अधिकृत शवविच्छेदन प्रमाणपत्र (Post-Mortem Report).
  5. मृत जनावराच्या कानातील टॅग स्पष्ट दिसेल असा लाभार्थ्यासोबतचा एकत्रित फोटो.
  6. नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावराचा मृतदेह उपलब्ध झाला नसल्यास कार्यक्षेत्रातील स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक आणि तलाठी यांचा संयुक्त पंचनामा अहवाल.
  7. अपघाती दाव्यासाठी पोलीस स्टेशनचा प्रथम खबरी अहवाल (FIR).


23. दावा रक्कम जमा करण्याची मुदत

लाभार्थ्याने सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विमा कंपनीने 15 दिवसांच्या आत दाव्याची रक्कम थेट लाभार्थ्याच्या आधार-संलग्न बँक खात्यात DBT द्वारे जमा करणे बंधनकारक आहे. विमा कंपनीने 15 दिवसांत वैध दावा मंजूर करून रक्कम अदा केली नाही तर 15 दिवसांनंतरच्या विलंबासाठी कंपनीला लाभार्थ्याला दरसाल दरशेकडा 12% व्याजदराने अतिरिक्त रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागेल.


24. विमा दावा नाकारल्यास

विमा कंपनीने कोणताही दावा नाकारल्यास त्याबाबतच्या अंतिम निर्णयासाठी प्रकरण प्रादेशिक नियंत्रण समितीच्या निदर्शनास आणणे बंधनकारक राहील.

प्रादेशिक नियंत्रण समिती

सदस्यपदनाम

संबंधित विभागाचे प्रादेशिक सह-आयुक्त पशुसंवर्धन दुग्धविकासअध्यक्ष
संबंधित जिल्ह्याचे उपायुक्त पशुसंवर्धन दुग्धविकाससदस्य
विमा कंपनीचे प्रतिनिधीसदस्य

प्रादेशिक नियंत्रण समितीने विमा दाव्याचा 30 दिवसांच्या आत पुनर्विचार करावा.

पुनर्विचारानंतर घेतलेला निर्णय राज्यस्तरीय समिती, विमा कंपनी आणि पशुपालकास कळविण्यात येईल.


राज्यस्तरीय समिती

सदस्यपदनाम
मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूरअध्यक्ष
संबंधित विभागाचे प्रादेशिक सह-आयुक्त पशुसंवर्धन दुग्धविकाससदस्य
विमा कंपनीचे प्रतिनिधीसदस्य


25. ऑनलाइन दावा ट्रॅकिंग

विमा कंपनीने दाव्यांची नोंदणी आणि दाव्याचा जलद निपटारा करण्यासाठी पोर्टल/समर्पित सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म विकसित करणे अपेक्षित आहे.

ही प्रणाली मराठी आणि English भाषेत उपलब्ध करून देण्यात येईल. त्याद्वारे पशुपालकास आपल्या दाव्याची सद्यस्थिती (Tracking) ऑनलाइन उपलब्ध होईल.


26. योजना प्रसिद्धी व जनजागृती

विमा कंपनीने मराठी भाषेत :

  • पत्रके
  • पोस्टर्स
  • रेडिओ
  • दूरदर्शन
  • वृत्तपत्र जाहिराती

याद्वारे योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी.

तसेच सर्व ग्रामपंचायत कार्यालये, तालुका पातळीवरील पशुवैद्यकीय संस्था आणि VVC-AH कार्यालयांमध्ये दावा प्रक्रियेसह योजनेची माहिती प्रदर्शित करावी.

प्रस्ताव/दावा फॉर्म मराठीत उपलब्ध करून देण्यात यावा.


27. पशुधन विमा मदत कक्ष व तक्रार निवारण

जिल्हा पातळीवर पशुधन विमा मदत कक्षासाठी एक प्रतिनिधी तसेच जिल्ह्यामध्ये विम्याच्या आवश्यकतेनुसार प्रतिनिधी नियुक्त करावेत.त्यांची यादी आणि संपर्क तपशील पशुवैद्यकीय संस्था व तालुका स्तरावर उपलब्ध करून द्यावेत. विमाधारकांसाठी समर्पित ग्राहक सेवा क्रमांक आणि तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून द्यावी.


28. विमा हप्ता अनुदानाची तरतूद

सुरुवातीच्या तीन महिन्यांत उतरविण्यात येणाऱ्या एकूण पशुधनाच्या विमा हप्ता अनुदानाची अग्रिम रक्कम विमाकर्त्याला सुरुवातीला देण्यात येईल. त्यानंतर विमा उतरविलेल्या प्राण्यांच्या संख्येचा तपशीलवार अहवाल सादर केल्यानंतर पुढील हप्ता देण्यात येईल.


29. विमा प्रक्रिया व दावे निकाली काढण्याची मुदत

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विमा प्रक्रिया आणि दावे 15 दिवसांच्या आत निकाली काढण्यात यावेत.


30. पशुवैद्यकांना मिळणारे मानधन

योजनेअंतर्गत :

  • आरोग्य दाखला देण्यासाठी – ₹50
  • शवविच्छेदन प्रमाणपत्रासाठी – ₹125

असे मानधन देण्यात येईल. हे मानधन थेट केंद्र निधीतून राज्य अंमलबजावणी संस्था (MLDB) मार्फत संबंधित पशुवैद्यकांच्या खात्यात प्रत्येक तिमाहीला वितरित केले जाईल.


31. योजनेचे सनियंत्रण

राज्य स्तरावर आयुक्त पशुसंवर्धन हे योजनेचे सनियंत्रण करतील.योजना अंमलबजावणी व योजना तसेच विमा कंपनीचे सनियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर करतील.प्रादेशिक स्तरावर संबंधित विभागाचे सह-आयुक्त पशुसंवर्धन दुग्धविकास, जिल्हा स्तरावर संबंधित जिल्ह्याचे उपायुक्त पशुसंवर्धन दुग्धविकास आणि तालुका स्तरावर संबंधित तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी सनियंत्रण करतील.


32. मासिक अहवाल

प्रत्येक जिल्ह्याने :

  • विमा उतरविलेली जनावरे
  • एकूण लाभार्थी
  • निकाली काढलेले दावे

यांचा विहित नमुन्यातील मासिक व प्रगती अहवाल (Monthly Progress Report) आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे सादर करणे अनिवार्य आहे.


33. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची भूमिका

पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची प्रमुख भूमिका :

  • पशुधनाची ओळख पटविणे
  • तपासणी करणे
  • विम्यासाठी बाजारभाव निश्चित करणे
  • टॅगिंग सुनिश्चित करणे
  • आरोग्य प्रमाणपत्र देणे

ही आहे. पशुधनाचा मृत्यू झाल्यास शवविच्छेदन (Post-Mortem) करून मृत्यूचे कारण दर्शविणारा अहवाल मालक/सर्वेअरला 72 तासांत सादर करणे आवश्यक राहील. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल.


34. अंमलबजावणी यंत्रणेची कर्तव्ये व जबाबदाऱ्या

  • अंमलबजावणी यंत्रणेने केंद्र शासनाने राष्ट्रीय पशुधन अभियानासंदर्भात निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करून राज्यात पशुधन विमा योजनेची अंमलबजावणी करावी.
  • महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योजना राबविण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात.
  • राज्यातील जास्तीत जास्त पशुधनास विमा संरक्षण कवच प्राप्त व्हावे यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा.
  • विमा कंपनी व पशुपालक यांच्यात समन्वय राखून तक्रार निवारण करावे.
  • वितरित करण्यात येणारा निधी केवळ विहित केलेल्या उद्दिष्टांसाठीच खर्च करण्यात यावा.
  • खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र (Utilization Certificate) आणि भौतिक प्रगती अहवाल वेळोवेळी आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयामार्फत केंद्र शासनाला सादर करणे बंधनकारक राहील.
  • विमा दाव्यांची प्रक्रिया सुलभ व जलद असावी आणि मृत जनावरांच्या दाव्यांचे निवारण विहित मुदतीत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात DBT द्वारे जमा करण्यात यावे.
  • योजनेचा नियमित आढावा जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समितीमार्फत घेण्यात यावा.


35. प्रसिद्धी व प्रचार

योजनेची व्यापक जनजागृती व प्रसिद्धी देण्याचे काम विमा कंपनीचे राहील.योजनेची व्यापक जनजागृती करण्यासाठी दूध संकलन संस्था, गो-मित्र आणि पंचायत राज संस्था यांच्या माध्यमातून प्रचार केला जाईल. या प्रचाराचा खर्च 100% केंद्र निधीतून केला जाईल.


36. वित्तीय मान्यता

राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त होणारा निधी आणि त्यानुरूप राज्य हिस्सा याद्वारे उपलब्ध होणाऱ्या आर्थिक तरतुदीच्या मर्यादेत पशुधन विमा योजनेची अंमलबजावणी करण्यास वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.


पशुधन विमा योजना 2026 : एका नजरेत

शासन निर्णयाची तारीख : 05 ऑगस्ट 2026

शासन शुद्धीपत्रकाची तारीख : 06 ऑगस्ट 2026

योजना : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना

अंमलबजावणी संस्था : महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (MLDB), नागपूर

विमा कंपनी : Agriculture Insurance Company of India Ltd. (AIC)

प्रति कुटुंब कमाल पशुधन : 10 पशुधन घटक

10 पेक्षा जास्त पशुधन घटक असल्यास : अतिरिक्त पशुधनासाठी विमा हप्त्याची पूर्ण रक्कम पशुपालकाने भरणे आवश्यक

कमाल विमा संरक्षित रक्कम :

  • गाय – ₹70,000
  • म्हैस – ₹80,000
  • बैल – ₹70,000
  • रेडा – ₹80,000
  • शेळी/मेंढी – ₹7,000

लाभार्थी हिस्सा : 15%

केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा : उर्वरित 85%, केंद्र : राज्य = 60 : 40

विमा कालावधी : 1, 2 किंवा 3 वर्षे

अपघाती दाव्यांसाठी विमा संरक्षण : विमा कंपनीला प्रीमियम प्राप्त झाल्यानंतर त्वरित

बिगर-अपघाती दाव्यांसाठी : 15 दिवसांनंतरचा कालावधी पात्र

मृत्यूची सूचना : 24 तासांच्या आत

आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर प्रस्ताव मंजुरी : 5 दिवसांच्या आत

दावा रक्कम जमा : आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 15 दिवसांच्या आत

विलंबाची भरपाई : दरसाल 12% व्याजदराने अतिरिक्त रक्कम

दावा नाकारल्यास : प्रादेशिक नियंत्रण समितीमार्फत पुनर्विचार

प्रादेशिक समितीचा पुनर्विचार : 30 दिवसांच्या आत

पशुवैद्यकीय आरोग्य दाखला मानधन : ₹50

शवविच्छेदन प्रमाणपत्र मानधन : ₹125


महत्त्वाची नोंद

वरील माहिती महाराष्ट्र शासनाच्या दि. 05 ऑगस्ट 2026 रोजीच्या पशुधन विमा योजनेच्या शासन निर्णयावर तसेच दि. 06 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन शुद्धीपत्रकावर आधारित आहे. दि. 06 ऑगस्ट 2026 च्या शासन शुद्धीपत्रकातील सुधारणा लक्षात घेऊनच वरील मजकूर मांडण्यात आला आहे.

शासन निर्णयाचा संकेतांक : 202608051907307145

शासन शुद्धीपत्रकाचा संकेतांक : 202608061635365945

सदर शासन निर्णय व शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 

तसेच येथे शासन निर्णय व शासन शुध्‍दीपत्रक पाहण्‍यासाठी उपलब्‍ध आहे. 


अधिक माहिती साठी शासन निर्णयाचे पुर्ण वाचन करावे, वरील माहिती ही  केवळ अभ्‍यासासाठी देण्‍यात आलेली आहे. वरील माहितीचा कोणत्‍याही ठिकाणी पुरावा म्‍हणुन वापर करता येणार नाही. तसेच शासन वेळोवेळी आपले निर्णयात सुधारणा करीत असते वरील माहिती ही अंतिम समजु नये  त्‍यानुसार अदयावत माहिती तपसुन घ्‍यावे. 

No comments:

Post a Comment